कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील गोगवे गावाशेजारी असलेल्या धामणी नदीपात्रात तीन दिवसांपूर्वी गायीला पाणी पाजण्यासाठी गेलेला वृद्ध नदीतून वाहून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पांडुरंग बाळा पडवळ (वय ७३) असे त्यांचे नाव असून कळे पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. नदीत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी आज (मंगळवार) शोधमोहीम राबवली.

पडवळ हे रविवार २० रोजी सकाळी आठच्या सुमारास धामणी नदीपात्रात पाणवठा या ठिकाणी गायीला पाणी पाजण्यासाठी व धुण्यासाठी म्हणून गेले होते. काही वेळाने गाय घरी परतली. पण पडवळ न परतल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी शोधाशोध केली. नदीकाठावर त्यांची काठी व चपला आढळून आल्या. मुलगा प्रदीप याने कळे पोली ठाण्यात वर्दी दिली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी नदीपात्रात बोटीने शोध मोहीम राबवली. पण त्यांचा शोध लागलेला नसून ते नदीपात्रातून वाहून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे.