कोल्हापूर (प्रतिनिधी) : वेधशाळेने जिल्ह्यात २१ २२ जुलै रोजी अतिवृष्टी होणार असल्याने या दिवसांकरिता रेड अलर्ट व २३ जुलैकरिता ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या कालावधीमध्ये अतिवृष्टी (प्रतिदिन ७० ते १५० मि.मी. किंवा त्याहून जास्त) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अति पाउसमान असलेल्या चंदगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेधशाळेच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील नदीपात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच डोंगराळ भागामध्ये भूस्खलन अथवा दरडी कोसळणे अथवा गावठाणातील जुन्या घरांची पडझड होणे यांसारख्या घटना संभावत असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे  आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.