कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (रविवार) राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांसह मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर बंदी घालत असल्याचे जाहीर केले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असून त्यासाठी त्यांनी ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला. अन्यथा, राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या आठ दिवसांच्या काळात रुग्णसंख्या वाढली तर लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. परिणामी गोकुळ, जिल्हा बँक यासह कोल्हापूर महापालिकेची निवडणूक आणखी काही दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे.

वास्तविक महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपून तब्बल सव्वातीन महिने झाले आहेत. गोकुळ आणि जिल्हा बँकेसह सहकारी संस्थांची मुदत संपली आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट  झाल्यानंतर या संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याच्या कामास वेग आला. या तीनही महत्त्वपूर्ण संस्थांची मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू झाली. गोकुळ आणि महापालिकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. जिल्हा बँकेची यादी लवकरच प्रसिद्ध होईल. अंतिम यादी प्रसिद्धीनंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

मात्र, यावर आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे जाण्याच्या शक्यतेने राजकीय आणि सहकार क्षेत्रात अस्वस्थता आहे. या निवडणुकांसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी आणि तयारी २०२० च्या सुरुवातीपासून केली आहे. मात्र, निवडणुका जसजशा लांबणीवर पडू लागल्या तसतशा राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. याचा फटका इच्छुकांना बसत आहे. याबरोबरच विशिष्ट मुदतीच्या बाहेर या निवडणुका लांबणीवर टाकता येणार नाहीत. सध्यातरी कोरोनामुळे बऱ्याच बाबतीत अनिश्चितता आहे. त्यामुळेच आठ दिवसांनंतर राज्य सरकार कोणता निर्णय घेते यावर संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय केंद्रबिंदू असलेल्या या तीनही संस्थांच्या निवडणुकांची तारीख अवलंबून आहे.