पन्हाळा येथे नवीन केलेल्या रस्त्याला भेगा पडण्यास सुरवात…

0
124

पन्हाळा (प्रतिनिधी) : अतिवृष्टी आणि भुस्खलनामुळे २३ जुलै रोजी पन्हाळा येथील जुन्या नाक्याजवळील रस्ता खचला होता. त्यातच २०१९ मध्ये नव्याने बांधलेल्या रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पन्हाळगडावर संकट उभे राहिले आहे.

सन २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे पन्हाळा-बुधवारपेठ हा नऊशे मीटर रस्ता खचला होता. सार्वजनीक बांधकाम विभागाकडून याचे काम सुमारे नऊ महिने सुरु होते. तोपर्यंत पन्हाळा आणि येथील पर्यटन बंद राहीले होते. आता या रस्त्याचा पुढील भाग अतिवृष्टी आणी भुस्खलनाने खचल्याने पन्हाळ्यातील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. दरम्यान, जुन्या नाक्याजवळ खचलेल्या रस्त्याच्या कडेने ये-जा करण्यासाठी लोकांना परवानगी दिली होती. पण आता त्या पुढील रस्त्याला भेगा पडू लागल्याने हा चालत जाण्याचा मार्गही आता बंद झाला आहे.

त्यातच पावसाचेही प्रमाण वाढले असून पाण्याचे लोट त्या रस्त्यावरुन वहात आहेत. याबाबत सार्वजनीक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अमोल कोळी यांना विचारले असता त्यांनी, डांबरी रस्त्याच्या खालच्या भागातला मातीचा भराव खाली दबल्याने डांबरी रस्त्याला तडे जावू शकतात. त्यामुळे सध्यातरी याबाबत काही बोलू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.