कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथील सर्वसामान्य कुटुंबातील युवक प्रदीप लायकर यांने दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट ‘पिरेम’ ३ डिसेंबररोजी महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे. १३ वर्षाच्या प्रदीर्घ खडतर प्रवासानंतर त्याचे दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे.  

प्रदीप रंगराव लायकर यांचा एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला. लहानपणापासूनच काहीतरी नवीन आणि वेगळं करायची त्यांची इच्छा होती. बी.ए. पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी २००९ सालापासून सिनेमा क्षेत्रात छोटं मोठं काम करून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. परिस्थिती बेताची, वडील शेतकरी, या क्षेत्राचा गंध नसतानाही घरच्यांनी त्याला खूप सपोर्ट केला.

त्यांनी पोशिंदा, बी कन्टिनीव, मायेची ऊब, म्हाळींगराया, या शॉर्ट फिल्म तयार केल्या आहेत. अनेक छोट्या मोठ्या जाहिरातीच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली. तसेच काही फिल्मचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले.

‘पिरेम’ या चित्रपटात ‘मुलगी झाली हो’ फेम नायिका दिव्या सुभाष, पेठवडगाव येथील विश्वजीत पाटील यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. मुख्य सहाय्यक दिग्दर्शन विजय पाटील यांनी केले आहे. पर्व फिल्म्स निर्मित व प्रदीप लायकर दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ३ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘पिरेम’ या चित्रपटात प्रेमाची एकच बाजू न मांडता. प्रेमाचे वेगवेगळे पैलू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एक निस्वार्थी, ग्रामीण प्रेमकथा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल, असा विश्वास दिग्दर्शक प्रदीप लायकर यांनी व्यक्त केला आहे.