कळे (प्रतिनिधी) : कळे येथील प्रसिद्ध व्यावसायिक कुटूंबातील दि. १९ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी आई आणि दोन मुलांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. नतंर याच कुटूंबातील वडिलांचा आज (गुरुवार) सहाव्या दिवशी कोरोनाच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने पन्हाळा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोनामुळे एकाच कुटूंबातील तिघांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने पन्हाळा तालुक्यासह जिल्हा हादरला होता. याच कुटूंबातील कोरोनाने आज चौथा बळी घेतला आहे. कुटूंबातील पाचजण बाधीत झाले होते. त्यापैकी उपचारा दरम्यान चौघांचे निधन झाले असून पाचवा पोलीस दलात असणारा मुलगा याचेवर अद्याप उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

पन्हाळा तालुक्याचा पश्चिम भाग गगनबावडा, राधानगरी तालुक्यातील काही गावात व्यवसायामुळे आदरयुक्त दबदबा असलेल्या या कुटूंबातील चार व्यक्ती कोरोना संसर्गामुळे गेल्याने कळेसह परिसर हादरून गेला असून तो अजून यातून सावरलेला  नाही. या सर्व परिचीत कुटूंबात सध्या पोलीस दलात कार्यरत एकजण तसेच तीन भावांच्या पत्नी आणि त्यांची सहा मुले एवढेच आता पश्चात राहिले आहेत.