कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात कडक लॉकडाऊन सुरु आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने कोल्हापुरातील चौका-चौकात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज (सोमवार) ऐतिहासिक बिंदू चौकात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांचे स्वॅब घेण्यात आले. त्यामध्ये सुमारे ४५ लोकांच्या स्वॅबपैकी पाच लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तसेच कळंबा येथील सात वर्षाच्या मुलासह त्याच्या आईला बाधा झाल्याचे आढळून आले. तर लक्ष्मीपुरी येथील बावीस वर्षीय तरुणही पॉझिटीव्ह मिळून आला. तर ग्रामीण भागातील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. या बाधितांना महापालिका आरोग्य प्रशासनाच्या भरारी पथकाने उपचारासाठी कोव्हिड सेंटरकडे नेण्यात आले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्येही लोक घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांची धरपकड करुन महापालिका आरोग्य पथकाकडून त्यांचे स्वॅब घेतले जात आहेत. रस्त्यावर फिरणारे लोक बाधीत सापडू लागल्याने धोका वाढू लागला आहे. कळंबा येथील आई आणि मुलगा हे दूचाकीवरुन गावात आले होते. त्यांचा स्वँब घेतला असता ते पॉझिटीव्ह मिळून आले असून त्यांचे पती कोरोनाबाधित आहेत. त्यांचेवर उपचार सुरु आहेत. पतीपाठोपाठ पत्नी आणि सात वर्षाचा मुलगाही बाधीत झाला आहे. यावेळी कळंबा हॉटस्पॉट असल्याचे महापालिका आरोग्य निरीक्षकांनी सांगितले.

तर कांही महाभाग वाहनधारक आम्ही टेस्ट केली आहे, दवाखान्यात चाललोय, औषधे घेण्यासाठी बाहेर आलो होतो अशी कारणे सांगून महापालिका कर्मचाऱ्यांशी वाद घालत होते. परंतु प्रशासनाच्या फौजफाट्याने या लोकांची धरपकड करुन त्यांचे सक्तीने स्वॅब घेतले. जे बिनधास्त फिरत होते त्यांच्यापासून अनेक लोकांना बाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ते कुठे फिरले, त्यांचे घरी कोण आहे, याची चौकशी करुन त्यांचेही स्वॅब घेण्याची तयारी प्रशासनाने केलीयं. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणारे लोक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे स्वॅब घेवून तपासणी करण्याचे आदेश प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे यांनी दिले आहेत. तर पालिकेची आरोग्य पथके चौकाचौकात तळ ठोकून रस्त्यावरील नागरिकांचे स्वॅब घेत आहेत. त्यासाठी या काळात बाहेर न पडता स्वत:बरोबरचं कुटूंबाची काळजी घेणे आता आवश्यक बनले आहे.