विशेष ( प्रतिनिधी ) राज्यात बहुतांशी ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांची कामे सुरु झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासह कोकणात मात्र पावसाची मुसळधार कोसळल्याने बहुतांशी पाणीसाठे देखील भरल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या चार दिवसात कोणताही अलर्ट नसून, पाऊस काहीसा उसंत घेणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस उसंत घेणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भातील काही ठिकाणांचा अपवाद वगळता राज्यात पुढील चार दिवस पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहून काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या शिवाय घाटमाथा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, काही अपवाद वगळता राज्यात पुढील चार दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे शेतीसह इतर कामे येत्या चार दिवसात गती घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.