पुणे (प्रतिनिधी) : दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच निर्धारित कालावधीत पार पडण्याच्या दृष्टीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, विविध समाज माध्यमाद्वारे दहावी आणि बारावी परीक्षेसंदर्भात विविध अफवा प्रसारित होत आहेत. या बातम्यांवर विद्यार्थी-पालकांनी विश्वास ठेवू नये. या परीक्षा नियोजित कालावधीतच होणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

भोसले यांनी सांगितले की, दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार आहेत. तसेच दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १२ ते २८ एप्रिल, तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा परीक्षा ५ ते २२ एप्रिल दरम्यान होणार आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू आहे. त्या अनुषंगाने परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच निर्धारित कालावधीत पार पडण्याच्या विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, विविध समाज माध्यमाद्वारे दहावी आणि बारावी परीक्षेसंदर्भात विविध अफवा प्रसारित होत आहेत. अशा कोणत्याही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये’’ असे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात मंडळामार्फत वेळोवेळी पूर्वीप्रमाणे अधिकृत निवेदने मंडळाच्या संकेतस्थळावर व प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच परीक्षेच्या अनुषंगाने विभागीय मंडळामार्फत या संदर्भातील लेखी सूचना वेळोवेळी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येतात. त्याच सूचना अधिकृत मानण्यात याव्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल-मे २०२१ मधील लेखी, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी मंडळामार्फत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना दोन दिवसांत देण्यात येणार आहेत. त्याचे काटेकोर पालन करावे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे.