कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यातच संभाव्य लॉकडाऊनच्या भीतीच्या छायेखाली सर्वसामान्य वावरत असताना शिवाजी पेठेत एक धक्कादायक प्रकार घडला. यामुळे परिसरात खळबळ उडाली. महापालिकेच्या विचित्र कारभारचा अनेकांना फटका बसला आहे. परंतु आता महापालिका आरोग्य विभागाची अतितत्परता एका व्यक्तीच्या जीवावर बेतली असती. या प्रकारानंतर महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे.            

शिवाजी पेठेत कोरोना रूग्ण सापडल्याची चुकीची माहिती आरोग्य विभागाला शुक्रवारी मिळाली. परंतु खातरजमा न करता तातडीने येथे आरोग्य यंत्रणा दाखल झाली. परिसरात औषध फवारणी करण्यात आली. शिवाय संबंधित व्यक्तीला बळजबरीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला.  त्यामुळे त्या व्यक्तीचे धाबे दणाणले. संबंधित व्यक्तीला कोणतीही लक्षणे नाहीत. पण आरोग्य विभागाच्या या प्रकारामुळे संबंधित व्यक्ती चांगलीच भांबावली.      

दरम्यान, चुकीच्या माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तीकडे चौकशी न करता तेथे कोरोनाचा रुग्ण सापडला असे गृहीत धरून त्या परिसरात औषध फवारणी  कशी काय केली ?. त्या व्यक्तीने तपासणीसाठी स्वॅबच दिलेला नाही. तरीही तो पॉझिटिव्ह रुग्ण आहे. हे त्यांना कसे समजले ? कोणी तरी खोडसाळपणे चुकीची माहिती दिली, तर  खातरजमा न करताच विश्वास कसा ठेवला ?, असे सवाल उपस्थित केले जात आहेत. संबंधित व्यक्तीला बळजबरीने रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्याने आजूबाजूला भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चुकीची माहिती देणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची  मागणी होऊ लागली आहे.