इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी परिसरातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. गंभीर परिस्थिती असतानाही संबंधित घटकांवर कारवाई करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चाढकल होत आहे. याबाबत वेळीच संबंधित घटकांवर कारवाई करावी, अन्यथा पुन्हा एकदा नागरिकांसोबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पर्यावरण प्रेमी संतोष हत्तीकर आणि विश्वास बालीघाटे यांनी दिला आहे.

नुकताच इचलकरंजीत एसटीपी व संपवेल पंपामधून मैलायुक्त सांडपाणी काळ्या ओढ्यातून थेट नदीपात्रात सोडण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार संतोष हत्तीकर यांनी नगरपालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिला होता. तरी देखील याबाबत कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी, मक्तेदार, इंजिनिअर, आरोग्य निरीक्षक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि मक्तेदाराची बँक गँरंटी जप्त करुन वीज कनेक्शन कट करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गंभीर परिस्थिती असूनही पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार संबंधित घटकांवर कारवाई करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ चालढकल करण्यात धन्यता मानत आहे. त्यामुळे आता पर्यावरणप्रेमींनी सर्व नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरु केली असल्याचा इशारा शिरढोणचे पर्यावरण प्रेमी विश्वास बालीघाटे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिला.