मुंबई (प्रतिनिधी) : जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दाणादाण करून केलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यांत दडी मारली. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. आता सप्टेंबरच्या सुरुवातीपासून मान्सूनचे राज्यात दिमाखात पुनरागमन झाले आहे. मागील पाच-सहा दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

मागील चोवीस तासांत मुंबई, पुणे आणि ठाणे (Thane) परिसरात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आता येत्या ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुढील २४ तासामधये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे पुढील ५ दिवसांत राज्यात विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोकण, मुंबई, कोल्हापूर, सातारा, नाशिक या ठिकाणी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.