नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीच्या अंतिम सामन्याला आता दोनच दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर १८ ते २२ जून या कालावधीत होणाऱ्या या सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची आज (मंगळवार) घोषणा करण्यात आली. के. एल. राहुल, मयंक अगरवाल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल यांना वगळण्यात आले आहे.

या सामन्यासाठी टीम इंडियाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे, तर उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना संधी मिळाली आहे. मधल्या फळीत कोहली आणि रहाणे व्यतिरिक्त आधारस्तंभ चेतेश्वर पुजाराचा समावेश आहे. हनुमा विहारीलाही संधी मिळाली आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी केलेल्या हैदराबादच्या मोहम्मद सिराजलाही स्थान देण्यात आले आहे.

या सामन्यापूर्वी न्यूझीलंडने या सामन्यासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली.

भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड संघ

केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉन्वे,कॉलिन डी ग्रॅन्डहोमे, मॅट हेनरी, काइल जेमिसन, टॉम लॅथम, हेनरी निकोलस, एजाज पटेल, टीम साउदी, रॉस टेलर, नील वॅग्नर, बीजे वॉटलिंग, विल यंग.