टोप (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामध्ये शिरोली परिसरातील बहुतांशी शेतजमीन पाण्याखाली गेली होती. अद्यापही काही ठिकाणी शेतीमध्ये पाणी साचून राहिले आहे. यामध्ये प्रामुख्याने ऊस तसेच भात शेतीसह अन्य पिकांचा समावेश आहे. पूरबाधित शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी शिरोली ग्रामविकास आघाडीने केली आहे. आज (सोमवार) याबाबतचे निवेदन कृषि अधिकारी आणि तलाठी  यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शासनाने जाहीर केलेल्या मदतीच्या संदर्भात जाचक अटी व निकषांची पूर्तता या परिसरातील सर्वसामान्य शेतकरी करू शकत नाही. कारण सद्य:स्थितीत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वारसाने नावावर झालेल्या नाहीत तसेच अनेक शेतकऱ्यांच्या पूरबाधित जमिनीचे पंचनामेही अद्याप झालेले नाहीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने जाहीर केलेली मदत जाचक अटी व निकषांमुळे शेतकऱ्यांपर्यंत न पोहचल्याने ते हवालदिल झाले आहेत. शासकीय मदत पूरबाधित शेतकऱ्यांना २०१९ प्रमाणे सरसकट मिळावी व याविषयीच्या जाचक अटी व निकष कमी करण्यात याव्यात याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या वेळी ग्रामविकास आघाडीचे डॉ. सुभाष पाटील, कृष्णात खवरे, बाळासाहेब पाटील, सलीम महात, दीपक यादव, बाजीराव पाटील, पिंटू करपे, राजेश पाटील, बबन संकपाळ, मदन संकपाळ, नारायण मोरे आदी उपस्थित होते.