कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : लम्पी त्वचारोगाबाबत शासनाने तातडीने उपाययोजना करावी, या मागणीचे निवेदन जिल्‍हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना देण्यात आले. संघाचे चेअरमन विश्वास पाटील व संचालक मंडळाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.

बाधित जनावरांचे विलगीकरण करून त्यासाठी छावणी तयार करण्यात यावी, ग्रा.पं. मार्फत लम्पीबाबत जनजागृती करावी, ग्रा.पं. तर्फे डास, माश्या, गोचीड, कीटक यांचा प्रतिबंध करण्यासाठी औषधाची फवारणी करून स्वच्छता मोहीम राबवावी, गावामध्ये आढळलेल्या लम्पीबाधित जनावरांच्या ग्रा.पं. मार्फत नोंदी घेऊन पशुसंवर्धन विभागास कळवाव्यात, मृत जनावरांचा मृतदेह उघड्यावर न टाकता शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रा.पं.ने घ्यावी.

बाहेरून जिल्ह्यामध्ये येणाऱ्या जनावरांचे लम्पी लसीकरण केल्याची खात्री करूनच प्रवेश द्यावेत, लम्पी आजार हा फक्त गायीला होत असल्याने बाहेर राज्यातून म्हशी खरेदीस शासनामार्फत परवानगी द्यावी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तालुक्यातील बी.डी.ओ व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांची गोकुळच्या संचालक मंडळासोबत व अधिकारी यांच्यासोबत लम्पीबाबत आढावा बैठक घेण्यात यावी, अशा विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी रेखावर यांनी लम्पी आजार रोखण्यासाठी विविध उपाययोजना गाव पातळीवर राबविण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तालुक्यातील बी.डी.ओ व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रा.पं., पोलीस पाटील यांना सूचना देण्यात येणार असल्याचे सागितले.

गोकुळमार्फत २ लाख लम्पी त्वचा रोगाची लस खरेदी करून संघाच्या कार्यक्षेत्रात सर्व गायींना मोफत टोचण्यात येत आहे. आज अखेर १ लाख ६० हजार पर्यंत लसीकरण झालेले आहे. सदरच्या लसीकरण करण्यासाठी संघाकडील ६० पशुवैद्यकीय अधिकारी, ४० एल.एस.एस व ४०० कृत्रिम रेतन सेवक यांची मदत घेण्यात येत आहेत, असे गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक नविद मुश्रीफ, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. यू. व्ही. मोगले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश दळवी, पशुसंवर्धन उपआयुक्त वाय. ए. पठाण, उपस्थित होते.