नागपूर (वृत्तसंस्था) : ठाकरे सरकारने औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील नाव देण्याचा प्रस्तावर मंजूर केला आणि हे तिन्ही निर्णय शिंदे सरकारने स्थगित केले असतील, तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेनेला विरोध करण्यासाठी नामांतराला स्थगिती दिल्याने राऊत यांनी शिंदे फडणवीसांवर हल्लाबोल चढवला आहे. संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी नामांतराला स्थगिती देण्याच्या निर्णयावर भाष्य करताना यासंदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असल्याचे राऊतांनी सांगितले.

ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगिती देऊन या सरकारने काय साध्य केले? असे विचारल्यावर संजय राऊत म्हणाले की, या सरकारने ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगिती देऊन काय साध्य केले? हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारा. मुख्यमंत्र्यांना विचारा असे मी म्हणणार नाही. कारण त्यांच्या हातात काहीच नाही. माझा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न आहे की, हे निर्णय स्थगित करुन तुम्ही काय साध्य करताय? एकाबाजूला तुम्ही शिवसेनेने हिंदुत्व सोडलंय, असा आक्रोश करताय आणि दुसरीकडे तुम्ही औरंगाबाद, उस्मानाबादबाबत घेतलेले निर्णय स्थगित करताय.’ औरंगाबादच्या नामांतराच्या स्थगिती देण्याच्या मुद्द्यावरुन राऊतांनी फडणवीसांवर टीकास्त्र डागले आहे. सत्ताधाऱ्यांचे औरंगजेबाशी काय नाते आहे ? असा थेट सवाल राऊतांनी केला आहे.