कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील उचगांवपैकी मणेर मळा  येथील दहा वर्षीय बालिका नूतन निलेश कांबळे (रा. कुलकर्णी कॉलीनी, मणेरमळा, उचगांव) ही शिरोली औद्योगिक वसाहतीमधील पूजा आकाश नलवडे यांच्या घरी सापडली. ही बालिका स्वतःहून कांबळे कुटुंब ओळखत असलेल्या नलवडे यांच्या घरी गेली होती. छायाचित्रासह प्रसिद्ध झालेले वृत्त पाहून पूजा नलवडे यांच्या घरी ही बालिका असल्याचे एकाने दूरध्वनीवरून गांधीनगर पोलीस ठाण्याला आज (रविवार) सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शिरोली औद्योगिक वसाहतीमधून बालिकेला ताब्यात घेतले.

नूतन कांबळेच्या शोधासाठी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीसप्रमुख तिरुपती काकडे, करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील यांनी सहा शोध पथके  विविध ठिकाणी रवाना केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू राहिला. नूतन कांबळे ही मावस चुलते रवी चंद्रकांत कट्टी यांच्याकडे राहते. तिचे वडील सहा वर्षांपूर्वी मयत झाले आहेत आणि नुतन सहा महिन्यांची असतानाच तिची आई तिला सोडून गेली आहे. कांबळे कुटुंबीयांच्या सर्वसंबंधित नातेवाईकांकडे पोलिसांची चौकशी  केली. गुरुवारी (दि.१८) ती दुपारी दोनच्या सुमारास जवळच राहणाऱ्या नातेवाइकाकडे कट्टी यांच्या मुलास घेऊन गेली होती.  पण ती तीथे जाण्यापूर्वीच अज्ञाताने तीला फूस लावून  पळवून नेले असावे असा पोलिसांचा अंदाज होता.

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलीचा आजी सांभाळ करते. गुरुवारी दुपारी मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाईकांची तारांबळ उडाली. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. सर्वत्र शोधाशोध सुरू होती. शनिवारी रात्री उशिरापर्यंत मुलीचा छडा लागला नव्हता. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले होते. ही मुलगी शिरोली औद्योगिक वसाहतमध्ये नलवडे यांच्या घरी असल्याचा गांधीनगर पोलिसांना एकाने दूरध्वनी केल्यानंतर तिथे जाऊन पोलिसांनी बालिकेला ताब्यात घेतले.

चौकशीअंती आजीच्या घरातील कामाला कंटाळून आपण स्वतःहून घरातून बाहेर पडून पूजा नलवडे यांच्याकडे वास्तव्याला गेल्याची माहिती तिने दिली. पूजा नलवडे आणि त्यांच्या कुटुंबाची संबंधित मुलीशी ओळख आहे. गुरुवारी दुपारी घरातून बाहेर पडल्यानंतर ही मुलगी चालत नलवडे यांच्या घरी गेली, असे पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील आणि दीपक भांडवलकर यांनी सांगितले.

या मुलीला बालकल्याण संकुलात पाठवण्यात आले आहे. अखंड ७२ तासांच्या तपासानंतर बालिका मिळून आल्याने उचगांवसह मणेर मळ्यातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.