शिये-निगवे रस्त्यावर भरधाव कारखाली सापडून तरुणीचा जागीच मृत्यू

0
1674

टोप (प्रतिनिधी) : मैत्रिणीला मोपेडवरून घरी सोडण्यासाठी जात असताना भरधाव कारखाली सापडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आर्या संजय पाटील (वय १८, रा. कोल्हापूर) असे तिचे नाव असून तिची मैत्रीण मल्लिका मन्सूर पठाण (वय १७, रा. शिये, ता. करवीर) जखमी झाली आहे. आज (शनिवार) दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात शिये-निगवे रस्त्यावरील क्रशर लाईनजवळ घडला. शिरोली एमआयडीसी पोलिसांत या अपघाताची नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्या आणि मल्लिका या कॉलेज मैत्रिणी आहेत. कॉलेज सुटल्यानंतर आर्या ही मोपेडवरून (एम एच ०९ व्ही आर २२८५) मल्लिकाला तिच्या शिये येथील घरी सोडण्यासाठी निघाली. दुपारी अडीचच्या सुमारास शिये-निगवे रस्त्यावरील क्रशर लाईनजवळ त्यांच्या मोपेडला निगवेकडून येणाऱ्या भरधाव कारने (एमएच ०९ एफ जे ७०७०) समोरून जोराची धडक दिली. या धडकेत आर्या व मल्लिका गाडीवरून खाली पडल्या. काही सेकंदातच आर्याच्या अंगावरून कारचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मल्लिका सुदैवाने बचावली. तिच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आर्याच्या या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.