कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील महिला शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या विनयभंगाच्या तक्रारीनुसार पोलिसांकडे सादर केलेल्या ऑडिओ क्लिपवरून विरोधी पक्षनेते विजय भोजे यांच्यावरील आरोपांची सत्यता ठरणार आहे.

कोल्हापूर जि. प.च्या शिक्षण विभागातील मॅट घोटाळा आता वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. नुकतीच  महिला शिक्षण अधिकाऱ्याने विरोधी पक्षनेते भोजे यांच्या विरोधात २०१९ साली झालेल्या प्रकरणावरून शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार दाखल केली आणि यावरून वेगळेच संदर्भ पुढे येऊ लागले. दरम्यान तक्रारदार शिक्षणाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे एक ऑडिओ क्लिप सादर केल्याचे समजते. या क्लिपमध्ये भोजे यांनी अश्लील भाषेत संभाषण केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या ऑडिओ क्लिपची तांत्रिक पडताळणी सायबर पोलीस करणार असून त्यानंतरच याची सत्यता सर्वांच्या समोर येईल.

तक्रार करण्यापूर्वी शिक्षणाधिकारी यांनी माझी कोणतीही परवानगी घेतली नाही. तसेच या बाबतीत कोणतीच चर्चा केली नसल्याचे जि. प. अध्यक्षांच्या कक्षात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी स्पष्ट केले. पण माझेकडे या संदर्भातील ऑडिओ – व्हिडिओ क्लिप आणि मेसेजेस असल्यामुळे तक्रार करत आहे, असे शाहूपुरी पोलीस स्टेशनमधून महिला शिक्षणाधिकारी यांनी फोनवर सांगितले असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.