कोल्हापूर (प्रतिनिधी) : रांगणा किल्ल्यावर मोबाइल स्टंटसाठी निर्दयपणे मारहाण करणार्‍या त्या चौघा जणांना पकडून चोप देऊन नागरिकांनी पोलीसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला असून भुदरगड पोलीसांनी त्यांना अटक केली आहे. ॠषिकेश भरत माने, प्रसाद शिवाजी माने दोघे (रा. कोगणूळी), उमेश राजाराम माने (रा. वडणगे), विजय नामदेव गुरव (रा. शिरगांव, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.

दरम्यान, या दोघांनी कोकणातील एका तरूणाला दारू पिल्याच्या कारणावरून निर्दयपणे मारहाण केल्याची मोबाईल क्लिप व्हायरल झाली असून निर्दयी मारहाणी विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

२६ जानेवारी रोजी रांगणा किल्ला येथे फिरण्यासाठी गेलेल्या गारगोटीतील एका युवकाला तंबाखू खाल्ल्याच्या कारणावरून माफी मागण्यास सांगून जमिनीवर नाक घासावयास लावले. नंतर माफी मागायला खाली वाकल्यानंतर त्या युवकाला लाथाबुक्क्यांनी तसेच झाडाच्या फांदीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या डाव्या हाताचे हाड फॅक्‍चर झाले, तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. या स्टंटबाज युवकांनी मारहाणीचे मोबाइलवरून शुटींग करून व्हिडिओ व्हायरल केला. हा प्रकार गारगोटी शहरात सर्वत्र वार्‍यासारखा पसरला.

रांगणा किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या कोकणातील एका तरूणाला दारू पिल्याच्या कारणावरून या चौघांनी निर्दयपणे मारहाण केली असून मारहाणाची क्लिप व्हायरल केली आहे. या दोन्ही प्रकारामुळे गारगोटीत संताप व्यक्त होऊ लागला. मारहाण करणारे हे चारजण मंगळवारी रात्री आपल्या गावी परत जात असतांना त्यांना वाटेत अडवून संतप्त जमावाने बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

वास्तविक आपणच खरे शिवभक्त आहोत असा आव आणून किल्ल्यावर येणाऱ्यांना मारहाण करण्याचा अधिकार यांना कुणी दिला ? कायदा हातात घेऊन एखाद्याला बेदम मारहाण करणे हे निषेधार्ह आहे. अशा स्टंटबाजांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया नागरीकांतून उमटत आहे.