ओडिशा (वृत्तसंस्था) : ‘अग्निपथ’ विरोधात सुरु असलेल्या आंदोलनातील पहिला बळी गेला आहे. भारतीय सैन्यात भरती होण्याची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने लेखी परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केली आहे. ओडिशामध्ये ही घटना घडली असून, या विद्यार्थ्याच्या पालकांनी केंद्र सरकारच्या योजनेला यासाठी जबाबदार धरलं आहे. या योजनेविरोधात देशभरात हिंसक निदर्शने सुरू आहेत.

बालासोरे जिल्ह्यातल्या तेन्तेई या गावातल्या या तरुणाचे नाव धनंजय मोहन्ती असे आहे. तो भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी खूप प्रयत्न करत होता. आर्मीची परीक्षा रद्द झाल्यानंतर या तरुणाने आत्महत्या केली आहे. या विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की, अग्निपथ योजना जाहीर झाल्यानंतर भारतीय सैन्याने लेखी परीक्षा रद्द केली. यामुळेच आपल्या मुलाने इतके टोकाचे पाऊल उचलले. या मुलाने स्वतःला गळफास लावून घेतला आहे.

धनंजयचा मित्र म्हणाला की, व्हॉटसपच्या माध्यमातून त्याला कळाले की, उत्तर प्रदेश, बिहार आणि कोलकत्त्यामधल्या अनेक तरुणांनी आत्महत्या केली. हे सगळे पाहून त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि काल रात्री त्याने टोकाचे पाऊल उचलले आणि आत्महत्या केली. मरण्यापूर्वी त्याने आम्हाला मेसेज पाठवला की सरकारवर विश्वास ठेवू नका आणि कधीही त्यांना मतदान करु नका.