मडिलगेत झाले पहिले नेत्रदान ; चळवळीचा विस्तारतोय परिघ  

0
425

आजरा (प्रतिनिधी) : मडिलगे (ता.आजरा) येथील भिमा दत्तू गुरव (वय ९३) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. मडिलगे गावातील हे पहिलेच तर आजरा तालुक्यातील चौथे नेत्रदान ठरले. गडहिंग्लज तालुक्यात रुजलेल्या या चळवळीचा परिघ आजरा तालुक्यातही विस्तारत चालला आहे.

मरणोत्तर नेत्रदान झालेले भिमा गुरव आजरा पंचायत समितीचे माजी सभापती भिकाजी गुरव आणि व्यंकटराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी गुरव यांचे वडील होत. गुरव बंधूंच्या आत्या लक्ष्मीबाई गुरव (बेळगुंदी) यांचे चळवळीत मरणोत्तर नेत्रदान झालेले आहे. त्यामुळे नेत्रदानाबाबतची त्यांना माहिती होती. दरम्यान, आज (मंगळवार) दुपारी अडीचच्या सुमारास भिमा गुरव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गुरव बंधू व कुटुंबीयांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. गडहिंग्लज येथील अंकूर सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटलच्या पथकाने मडिलगे येथे येऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली.

गडहिंग्लज तालुक्यात नेत्रदान चळवळ चांगलीच रुजली आहे. कोरोनाच्या प्रदीर्घ ब्रेकनंतर गेल्या पंधरा दिवसात झालेले हे तिसरे नेत्रदान आहे. आजरा तालुक्यात यापूर्वी उत्तूर येथील एका तर सरोळी येथील दोन व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. आजरा तालुक्यातील आजचे चौथे नेत्रदान ठरले. यातून चळवळीचा परिघ विस्तारत असल्याचे दिसून येत आहे.