गारगोटी (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आ. प्रकाश आबिटकर यांचेसाठी खा. संजय मंडलिक यांचा शब्द अंतिम असेल, अशी चर्चा रंगली आहे. आ. आबिटकर यांनी अजून या निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये. त्यामागे कार्यकर्त्यांचा असणारा दबाव आणि जागावाटप हे दोन मुद्दे कळीचे ठरत आहेत. त्यामुळेच अजून हा निर्णय होत नसल्याचे बोलले जात आहे.

गोकुळच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची मोट बांधली आहे. पण स्थानिक राजकारणामुळे माजी आ. सत्यजित पाटील-सरुडकर यांनी विरोधी आघाडीतून काढता पाय घेतला. आता आ. आबिटकर यांच्या निर्णयाकडेही सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. आबिटकर यांनी अजून आपली भूमिका जाहीर केलेली नाहीये. खा. मंडलिक आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी काल (रविवार) आ. आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. चर्चेचा वृत्तांत अजूनही गुलदस्त्यात आहे. इतके होऊनही आबिटकर यांनी अजूनही मौन पाळले आहे. यामागे गोकुळमधील जागावाटप, केडीसीसी बँकेची आगामी निवडणूक आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा दबाव ही कारणे असल्याचे बोलले जात आहे.

आ. आबिटकर यांनी ‘गोकुळ’साठी दोन जागांचा प्रस्ताव मांडला असल्याचे समजते. यामध्ये पुढील राजकारणाच्या अनुषंगाने ‘राधानगरी’तून अभिजीत तायशेटे तर ‘भुदरगड’मधून के. जी. नांदेकर या दोघांसाठी आबिटकर आग्रही असल्याचे समजते. वास्तविक, राधानगरीतून आधीच विरोधी आघाडीतून अरूण डोंगळे, विजयसिंह मोरे तर भुदरगडमधून माजी आ. के. पी. पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे विरोधी आघाडीतील जागांचे मुख्य दावेदार आहेत. अशा परिस्थितीत आबिटकर गटाला या जागा मिळणार का, हा प्रश्नही निर्माण झाला आहे.

याचबरोबर आ. आबिटकर यांनी जिल्हा बँकेतही संस्था गटातून त्यांचे बंधू अर्जुन आबिटकर यांच्यासाठी मागणी केल्याचे समजते. आबिटकर यांचा जागावाटपाचा हा तिढा अजून अधांतरीच आहे. याचबरोबर गोकुळमध्ये विरोधी आघाडीत के. पी. पाटील, डोंगळे आणि ए. वाय. पाटील हे विरोधी नेते असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर प्रचार करण्याची मानसिकता आबिटकर यांच्या कार्यकर्त्यांची अजिबात नाहीये. त्यांचाही मोठा दबाव आ. आबिटकर यांच्यावर आहे.

आ. आबिटकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी सध्या पालकमंत्री सतेज पाटील आणि खासदार संजय मंडलिक यांनी पुढाकार घेतला आहे. राधानगरी, भुदरगड तालुक्यातील राजकारण शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असेच आहे. त्यामुळे कळीचा मुद्दा राष्ट्रवादी हाच आहे. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने समझोता करताना जागावाटपात आणि भविष्यातील जिल्हा बँक आणि आमदारकीच्या राजकारणात राष्ट्रवादीवरच परिणाम होणार आहे. त्यामुळे विरोधी महाविकास आघाडीचे नेतृत्व मंत्री हसन मुश्रीफ करीत असले, तरी आ. आबिटकर यांची समजूत काढण्याच्या प्रक्रियेत मात्र मंत्री हसन मुश्रीफ बऱ्याच अंशी अलिप्त राहिल्याचे दिसून येत आहे.

आ. आबिटकर हे जरी महाविकास आघाडीच्या विरोधात गेले तर ‘राधानगरी-भुदरगड’मधील मूळ शिवसेना ही महाविकास आघाडीबरोबरच राहणार असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता आ. आबिटकर यांच्यासमोर मोठा ‘पेच’ निर्माण झाला असून यावर ते काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. खा. मंडलिक यांचा शब्द आपल्यासाठी अंतिम असेल असे जरी आ. आबिटकर म्हणत असले, तरी हा तिढा ते कसे सोडवितात हेच पहावे लागेल…