नीरज चोप्राचा अनोखा सन्मान ! ७ ऑगस्ट आता ‘भालाफेक दिवस’

0
21

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला तब्बल १३ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा सर्व भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलाय. नीरज चोप्रावर सर्व थरातून कौतुकाबरोबर बक्षिसांचा वर्षाव होतोय. आता नीरजला आणखी एका प्रकारे गौरविले जाणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने ७ ऑगस्ट रोजी झालेल्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याबद्दल भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने ७ ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. संघटनेचे अध्यक्ष ललित भानोत यांनी आज (मंगळवार) ही घोषणा केली.

आज दिल्ली येथे एका कार्यक्रमात भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्रासह सर्व खेळाडूंचा सन्मान केला. यावेळी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या भालाफेक स्पर्धेचीही घोषणा करण्यात आली. अध्यक्ष भानोत यांनी यावेळी सांगितले की, महासंघाच्या नियोजन समितीने भालाफेक स्पर्धेला आणखी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त तरुण या खेळात सामील होतील. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी ७ ऑगस्ट हा भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जाईल. या दिवशी देशभरात भालाफेक स्पर्धा आयोजित केल्या जातील, कारण नीरज चोप्रा याने याच दिवशी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

महासंघाच्या या घोषणेने अतिशय आनंद झालाय. मी भाग्यवान असून हा आपला आणखी एक सन्मान असल्याची प्रतिक्रिया चोप्रा याने यावेळी व्यक्त केली.