मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता १ मे सकाळी ७ पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संचारबंदीच लागू करण्यात आल्याने पदवीच्या विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून ऑफलाईन परीक्षा देंत कठीण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व १३ अकृषी विद्यापीठातील उर्वरित परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आज (गुरुवार) सायंकाळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उद्यापासून हा निर्णय अमलात येणार आहे. 

आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे पर्याय देण्यात आले होते. विद्यापीठांना त्यासंदर्भात निर्णय घेण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा सुरू देखील केल्या होत्या.

कोविडच्या परिस्थितीमुळे आणि नव्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. त्यामुळेच आम्ही सर्वानुमते निर्णय घेतलाय की महाराष्ट्रातल्या सर्व १३ अकृषी विद्यापीठांमध्ये उरलेल्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील. या परीक्षा घेताना जर विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार असतील, तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना आणि विनंती मी सर्व १३ विद्यापीठांच्या कुलगुरुंना केली आहे. या परीक्षांमधून कोणतेही विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, याची दक्षता या विद्यापीठांनी घेतली पाहिजे, अशी सूचना उदय सामंत यांनी केली.