मुंबई (प्रतिनिधी) : हिवाळी अधिवेशनातच विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड  होईल व अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (शनिवार) येथे सांगितले. टिळक भवन येथे प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते.  

पटोले पुढे म्हणाले की, कोरोनामुळे आतापर्यंत झालेल्या अधिवेशनाचा कालावधी कमी होता. अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेसाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवड आतापर्यंत लांबणीवर पडत गेली.

मात्र, हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया होईल. व ती आवाजी मतदानाने होईल. ही निवड होण्याची पद्धत देशभर सर्वच राज्यात आहे त्यात काही गैर नाही. विधानसभेने त्यांच्या नियमावलीत बदल केलेला आहे. महाराष्ट्रातही विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवड याच पद्धतीने होत असते. त्यामुळे यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही, असेही पटोले यांनी म्हटले आहे.