कोल्हापूर (विजय पोवार) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या निवडणुकीचे रणांगण तापण्यास सुरवात झाली आहे. सत्तारूढ आघाडी सध्या तरी गोकुळची प्रगती आणि दूध उत्पादकांना देण्यात येणारी आर्थिक सुबत्ता या मुद्द्यावर सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर विरोधी आघाडीने सत्तारुढ आघाडीतील फुटीचा फायदा घेत सत्ता खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. फुटीर संचालकांनी सत्तारूढ आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्धार केल्याने विरोधी आघाडीला अधिक बळ मिळत आहे. त्यामुळे यापूर्वी एकतर्फी  होणारी ही निवडणूक तुल्यबळ लढतीने अटीतटीची होणार असे चित्र दिसू लागले आहे.

गोकुळ दूध संघात गेली अनेक वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील आघाडीची एकहाती सत्ता आहे. गेल्या निवडणुकीपासून पालकमंत्री सतेज पाटील गोकुळची सत्ता हाती घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. एकाकी नेतृत्व करूनही गेल्या वेळी त्यांनी लक्षणीय मते घेताना दोन जागाही मिळवल्या. अगदी थोड्या मतांनी पॅनलचा पराभव झाला. पण त्यांनी गेल्या पाच वर्षात गोकुळमधील सत्तारूढ आघाडीच्या विरोधात रान उठवले. याबरोबरच विश्वास नारायण पाटील, अरुण डोंगळे या दोन ज्येष्ठ संचालकासह शशिकांत पाटील चुयेकर यांना सत्तारूढ आघाडीपासून बाजूला करण्यात यश मिळवले आहे. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्तारूढ आघाडीला फुटीचे ग्रहण लागले आहे.

गेली अनेक वर्षे गोकुळ मध्ये माजी आ. महादेवराव महाडिक, आ. पी.एन.पाटील आणि ज्येष्ठ संचालक अरुण नरके हे नेतृत्व करीत आहेत. या निवडणुकीत माजी आ. महादेवराव महाडिक यांनी सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व आ. पी. एन. पाटील यांच्याकडे सोपवले आहे. महाडिक यांनी पाठीमागून जोडण्या लावण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी जाहीरपणे काही बोलणे टाळले आहे. गोकुळच्या निवडणुकीत पक्षीय अभिनिवेश नसले, तरी त्याला पक्षीय स्वरूप देऊन विरोधी आघाडीकडून  सत्तारुढ मधील नेत्यांना आणि काही संचालकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी विरोधी आघाडीने आमची महाविकास आघाडी असल्याचे जाहीर केले आहे. आणि त्याला अगदी राज्यासह जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे ही संदर्भ जोडले आहेत.

गेल्या वेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी आघाडीला मदत केली नाही. त्याचा फायदा सत्तारूढ आघाडीला झाला. यावेळी मात्र, मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सोबत आहेत. महाविकास आघाडी म्हणूनच गोकुळची निवडणूक लढवण्याची कल्पना मंत्री मुश्रीफ यांचीच आहे. तर सध्या महाडिक यांच्यावर भाजपचा शिक्का आहे. काँग्रेसचे असलेले आ. पी. एन. पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेतील संचालकांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. आणि त्याला यशही  येत आहे.  सध्या सत्तारुढ आघाडीकडे माजी आ. महादेवराव महाडिक हे नेते, भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आमदार विनय कोरे, विद्यमान चेअरमन रवींद्र आपटे, सदानंद हत्तरकी, प्रकाश आवडे हे भाजपकडे कल असलेले नेते आणि उमेदवार आहेत. तर आमदार पी. एन. पाटील, अरुण नरके हे काँग्रेसचे आहेत. संचालिका अनुराधा पाटील यांचे सुपुत्र माजी आ. सत्यजित पाटील, अंबरीशसिंह घाटगे हे देखील शिवसेनेचे आहेत. म्हणूनच महाविकास आघाडी म्हणून आमदार पी. एन. पाटील यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तर अंबरीशसिंह घाटगे, अनुराधा पाटील, आ. राजेश पाटील हे मंत्री सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि महाविकास आघाडी म्हणून विरोधी आघाडीत येण्याची दाट शक्यता आहे. तर विश्वास नारायण पाटील आणि अरुण डोंगळे, शशिकांत पाटील चुयेकर यांची पावले विरोधी आघाडीकडे वळली आहेत. विद्यमान संचालकापैकी बरेच संचालक विरोधी आघाडीत सामील होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे विरोधी आघाडीचे बळ वाढत आहे. विद्यमान संचालक विरोधी आघाडीत गेले, तर सत्तारूढ आघाडीला नव्या चेहऱ्यांचा शोध घ्यावा लागेल. आणि सत्ता राखण्याची संपूर्ण जबाबदारी महाडिक, नरके, पी. एन. पाटील यांच्यावरच पडणार आहे. म्हणजेच फुटीर संचालक हे सत्तारूढ आघाडीची डोकेदुखी तर विरोधी आघाडीला बळ देणारे ठरणार आहे. त्यामुळेच गोकुळची निवडणूक तुल्यबळ लढतीने अटीतटीची होणार, असे चित्र दिसत आहे.