धामोड (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील तिलारी नगराच्या पूर्वेकडील बांद्राई धनगरवाड्यावरील लांबोरे कुटुंबीय १२ फेब्रुवारी रोजी देवदर्शनासाठी पंढरपूरला निघाले होते. त्यांच्या मोटारीने पंढरपूरजवळ कासेगाव रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने या कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर कुटुंबप्रमुख  काळू धोंडिबा लांबोरे यांचे दोन्ही पाय निकामी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता या कुटुंबात  लहान मुले आणि स्त्रिया उरल्या असून आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने त्यांना मदतीचा हात हवा आहे.

या घटनेला आणखीन पाच-सहा दिवसांनी एक महिना पूर्ण होईल पण एकाही लोकप्रतिनिधीने या कुटुंबाला भेट देण्याची तसदी घेतलेली नाही. चंदगड तालुक्यात बिदरमाळ, नगरगाव, कानुर, काजीर्णे, तिलारी, कोहाळी, कळसगादी, कलीवडे, जंगमहट्टी, म्हाळुंगे, बुजवडे  आणि बांद्राई धनगरवाड्याशेजारी सात धनगरवाडे येतात. या धनगरवाड्यावर इतर भौतिक सुविधा सोडाच, पण असे कौटुंबिक प्रसंग निर्माण झाला तरी कोणीही मदतीचा हात पुढे करत नाही.

प्रत्येक निवडणुकीत हे धनगरवाडे आम्ही आजपासून दत्तक घेतले आहेत असे छाती बडवून सांगणारे लोकप्रतिनिधी, तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी, सामाजिक संस्थांनी लांबोरे कुटुंबीयांना सढळ हस्ते आर्थिक मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.