दिड कोटींचा गंडा घालणारा ‘डिजे’ अखेर पोलीसांच्या जाळ्यात…

0
623

टोप (प्रतिनिधी) : हालोंडी आणि हेर्लेसह परिसरातील लोकांना कमी किंमतीत सोने देतो, असे सांगून सुमारे दिड कोटींचा गंडा घालणाऱ्या हालोंडीच्या दत्तात्रय मारुती जामदार उर्फ डीजेला चेकबाऊन्स प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी काल (शनिवार) अटक केली. या प्रकरणात तक्रारदार पुढे आल्याने आता तपासाला गती येत आहे. आज हालोंडीतील दोघांनी डीजे विरोधात शिरोली एमआयडीसी पोलीसात तक्रारी दाखल केल्या आहेत.

एवढया मोठ्या फसवणूकीच्या गुन्ह्यातील डीजे हा तक्रारी येत नसल्याने खूलेआम फिरत होता. तो हालोंडीतून बाहेर गेल्याने हा तपास थांबला होता. पण सोने देऊ शकत नसल्याने डीजेने तक्रारदारांना चेक देऊन स्वतःवरची कारवाई टाळली होती. मात्र, यातीलच एका तक्रारदाराने चेकबाऊन्स प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे डीजेवर वॉरंट काढण्यात आले होते. अखेर डीजेला शिरोली एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या सासरवाडीतून काल ताब्यात घेऊन अटक केली.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, हालोंडी येथील दत्तात्रय जामदार उर्फ डीजेने तेथीलच एका खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन औद्योगिक वसाहतीमध्ये छोटा व्यवसाय सुरू केला. यातून तो एका बँक अधिकाऱ्याच्या संपर्कात आला. या ओळखीतून त्याला बँक लिलावातील सोने कमी किंमतीत मिळाले. हेच सोने त्याने संबंधित खासगी सावकाराला दिले. त्यामुळे त्याचा गैरप्रसार सूरू झाला. यातून काहींनी स्वतःहून त्याच्याकडे रक्कम देत पुढच्या लिलावातील सोने आम्हाला दे असे सांगितले. याचा गैरफायदा घेत डीजेने गुंतवणूकदारांच्या संबंधित व्यक्तींना गंडा घालण्यास सुरुवात केली. हालोंडी आणि हेर्ले येथील सुमारे पंधरा जणांनी कमी किंमतीतील सोने मिळविण्यासाठी दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे समजते. यातीलच एका व्यक्तीला चेक देऊन त्याने फसवले. आणि चेकबाऊन्स केल्याच्या गुन्ह्यात तो न्यायालयाकडून पोलिसांच्या ताब्यात आला.

डीजेला शिरोली एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले हे कळल्यावर त्याच्याकडून फसवणूक झालेल्या लोकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. अडीच ते तीन वर्षांपासून गुंतवणूकदारांना गुंगारा देणार्‍या डीजेकडून आतातरी आपली रक्कम परत मिळेल या आशेवर लोकांनी पोलीस ठाण्यात आपली उपस्थिती लावली होती.