टोपमधील गैरप्रकार रोखण्यासाठी गावकऱ्यांचा निर्धार

0
1209

टोप (प्रतिनिधी) : टोप परिसरात क्रशर, खाणी असल्याने अनेक वेळा उत्खननाच्या कारणावरून गावात वारंवार वादाचे प्रसंग घडत असतात. असाच वाद सोमवारी (दि.२०) विकोपाला जाऊन दोन गटात जोरदार हणामारी झाली. यात काहीजण जखमी झाले. या प्रकारामुळे गावाचे नाव बदनाम होत असल्याने याला पायबंद घालण्यासाठी सोमवारी (दि.२७) मूक मोर्चा काढण्याचा निर्णय आज (शुक्रवार) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.

तसेच याबाबतचे निवेदन मोर्चा काढून ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, पोलीस यांना देण्यात येणार आहे. टोप गावात गेल्या काही वर्षांपासून उत्खननाच्या कारणावरून हमरीतुमरीचे प्रकार घडत आहेत. याला विरोध करणाऱ्या तरूण कार्यकर्त्यांवर उत्खनन करणारे काही लोक दंडुकेशाही वापरून हल्ला करतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि उत्खनन करणाऱ्या लोकांना जशास तसे उत्तर देण्यासाठी यावेळी तरूणाईने पुढाकार घेतला आहे.

टोपमध्ये गायरान जमीनीचे क्षेत्र कमी झाले आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. तर अनेक जणांकडून अजूनही अतिक्रमण सुरू असल्याने  वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. यातून एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत मजल गेली आहे. यात गेले अनेक वर्ष एका गटाकडून अरेरावी, मारहाण, दहशत माजविणे,  असे गैरप्रकार होत आहेत. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी जशासतशा पद्धतीने उत्तर देण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला. यावेळी सर्वपक्षीय नेते, शेकडो तरुण, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.