मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढीवारीसाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने आज  (मंगळवार) नियमावली जाहीर केली आहे. देहू व आळंदी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली असून उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येणार आहे.

यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे. यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे विभागाने नियमावलीत नमूद केले आहे.

मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे खरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पैार्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास आणि शासकीय महापूजा व विठ्ठल संतांच्या भेटीस गतवर्षाप्रमाणे मान्यता देण्यात आली आहे. तर ‘श्रीं’चे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवून आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येईल.

वारकरी संख्येच्या निकषानुसार संतांच्या पादुका भेटीसाठी, मानाच्या पालखीसाठी ४० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी दोन बस व प्रत्येकी बसमध्ये २० प्रमाणे ४० संख्या निश्चित केली आहे. गोपाळकालासाठी मानाच्या पालखी सोहळयाला १+१० या प्रमाणात गोपाळपूर येथे भजन व कीर्तनास परवानगी देण्यात आली आहे.

आषाढी एकादशी दिवशी म्हणजे २० जुलै रोजी स्थानिक महाराज अशा १९५ मंडळींना विठ्ठल- रूक्मिणीमातेचे मुखदर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत त्यांना वेळ व प्रवेशपत्रिका देण्याबाबतची कार्यवाही मंदिर समितीने करावयाची आहे. यासोबतच गेल्यावर्षी मंदीर खुले करण्याबाबत जी स्थिती होती तीच कायम राहील.