मुंबई / कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर विविध निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. सहकार विभागाने ३१ ऑगस्टपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्याचा आदेश काही महिन्यांपूर्वी दिला होता. आता मात्र जिल्हा सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरु करावी, असा आदेश आज (सोमवार) सहकार विभागाने दिला. त्यामुळे विविध जिल्ह्यातील बँकांसह कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोरोनामुळे अनेक जिल्हा बँकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत तर काही जिल्हा बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपून १५ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. सहकार विभागाने कोरानामुळे ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या. आता मात्र जिल्हा बँकांच्या निवडणुका ३१ ऑगस्टनंतर तातडीने घेता याव्या यासाठी आतापासून प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

प्रारूप मतदार याद्या, सुनावणी, अंतिम मतदार याद्या तयार करणेसह अन्य प्रक्रिया तयार करण्यासाठी किमान २५ दिवस कालावधी लागणार असल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. ज्या प्रक्रियेपासून स्थगिती दिली होती. तेथून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासंबंधीचे परिपत्रक आज काढण्यात आले आहे.

या आदेशामुळे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या बँकेवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता आहे. या बँकेच्या रूपाने जिल्ह्याची आर्थिक नाडी हातात राहावी, यासाठी सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षही प्रयत्न करणार हे उघड आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग येणार आहे.