यंदाच्या आयपीएलची तारीख ठरली, पण… 

0
260

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या वर्षी युएईमध्ये झालेली आयपीएल यंदा थेट स्टेडियममध्ये जाऊन बघता येणार आहे. आयपीएलच्या तारखा निश्चित झाल्याची माहिती आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलमधील सूत्रांनी दिली आहे. परंतु, आयपीएलची तारीख आणि ठिकाण यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 

येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलचे सामने सुरू होणार आहेत. तर ३० मेरोजी  अंतिम सामना होईल. याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात जीसीची बैठक होणार आहे. त्यामध्ये तारखांवर शिक्कामोर्तब होईल. दरम्यान, तारखांबाबत निश्चित माहिती असली, तरी सामने कुठे भरवले जावेत? याविषयी काहीही ठरवलेले नाही. सुरुवातीला आयपीएलमधील सामने एकाच शहरात भरवण्याचा विचार सुरू होता. मात्र, आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर अधिक शहरांमध्ये सामने भरवण्याचा विचार सुरू आहे. यामध्ये मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद या शहरांचा प्रामुख्याने विचार केला जात असल्याचे समजते.