राशिवडे (प्रतिनिधी) : संस्कारित मुले हीच आपली धनदौलत आणि राष्ट्राची संपत्ती आहे. याची जाण ठेऊन आईवडिलांनी आपल्या पाल्यावर संस्कार करावेत, असे प्रतिपादन प्रा. पवन पाटील यांनी केले. राशिवडे बु. येथील शिवबा प्रतिष्ठान आयोजित शिवमहोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे वीर शिवा काशिद यांचे थेट वंशज आनंदा काशीद होते.

३ दिवसीय महोत्सवात शिवप्रेरणा ज्योत आगमन, शिवजन्मोत्सव,  कृष्णात जाधव यांचा शाहिरी पोवाडा,  बाल वक्ता आयुष शिंदे याचे व्याख्यान,  रक्तदान शिबिर, किल्ले बांधणी स्पर्धा,  पोलीस भरती सराव लेखी परीक्षा आदी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

राशिवडे येथे प्रथमच लहान मुलांच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या शिवबा प्रतिष्ठानने शिवमहोत्सवाचे  केलेले आयोजन कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन  प्रमुख पाहुणे आनंदा काशीद यांनी व्यक्त केले. यावेळी आदर्श कुस्ती निवेदक पुरस्कार मिळाल्याबद्दल कृष्णात चौगुले (वस्ताद) यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना कृष्णात चौगुले म्हणाले की, नुसती शिवजयंती करण्यापेक्षा अशा प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे.

५ वर्षीय बाल वक्ता आयुष शिंदे याचे   व्याख्यान झाले.  त्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  अथर्व परीट यांनी  स्वागत केले. सुजल पोवार  यांनी सूत्रसंचालन  केले.  तर निशांत लाड यांनी आभार मानले.