मुंबई, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊनही तो मोकाट आहे. चौकशी आणि तपासाच्या नावाखाली आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. आरोपी राजरोस फिरत असताना पोलीस शांत का बसले आहेत ?,  असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडियावर कँम्पेन चालू झाले आहे. पीडिता आणि तिच्या कुटुंबावर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी वाघ यांनी केली आहे. राज्यात लागू झालेल्या शक्ती विधेयकात राजकीय कार्यकर्त्यांसाठी विशेषत: सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी वेगळी तरतूद केली  आहे का?,  असा सवालही  वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना केला आहे.

दरम्यान,  बलात्काराचे आरोप मेहबूब शेख यांनी फेटाळून लावले आहेत.  संबंधित तरुणीला प्रत्यक्ष भेटलो किंवा फोनवर बोललेलो नाही. मी १०  आणि ११ तारखेला कार्यक्रमानिमित्त  मुंबईत होतो. नार्को टेस्ट कऱण्यासाठी मी तयार आहे. १४ नोव्हेंबरला मी गावाकडे होतो. पोलिसांना  कोणतेही सहकार्य करण्यास   तयार  असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.