कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळविण्यास पालकमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, किंबहुना कोल्हापुरातील कोरोनाच्या उद्रेकास सर्वस्वी तेच जबाबदार आहेत हे जनतेला कळून चुकले आहे. काँग्रेसने पत्रकाद्वारे भाजपावर जे आरोप केले आहेत ते पाहता त्यांनीही मूकपणे पालकमंत्र्यांची निष्क्रियता मान्य केली आहे असेच म्हणावे लागेल, अशा शब्दांत भाजपने ना. सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज (मंगळवार) पत्रक काढून काँग्रेससह पालकमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. पत्रकात म्हटले आहे की, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर टीका करणे हाच काही जणांचा प्रसिद्धीचा मार्ग बनला आहे. ज्यांना आयुष्यात राजकारण करुन एका वॉर्डच्या पुढे जाता जमले नाही ते दादांवर टीका करतात यातून त्यांची असूया स्पष्ट होते. हे म्हणजे काजव्याने सूर्यावर टीका करण्यासारखे आहे. दादांनी कोरोना काळात ‘सेवा ही संघटन’ या भाजपाच्या सूत्रानुसार राज्यभर जे काही सेवा प्रकल्प उभारले, जी काही सेवा कार्ये केली त्याची माहिती काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. पालकमंत्र्यांनी तर, सत्तेत नसताना दादा काय काय करत आहेत याचा आदर्श घेतला पाहिजे. परंतु भाजपा कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणच्या कोविड सेंटरला विरोध करून गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना हे कसे समजणार ?

मे आणि जून महिन्यात कोल्हापुरात कोरोना संक्रमणाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली. देशात कोल्हापूरचे नाव बदनाम झाले. त्यावेळी प्रभावी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करून पालकमंत्री गोकुळ चा विजय साजरा करण्यातच अधिक मग्न होते हे जनतेने पाहिले आहे. भाजपावर कोणतेही आरोप करण्यापूर्वी काँग्रेस पदाधिका एकदा आत्मचिंतन करावे असे भाजपाचे मत आहे.

या पत्रकावर प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, अजित ठाणेकर, विजय खाडे यांच्या सह्या आहेत.