गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बेळगावात शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या गाडीवर कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला, मराठी फलकांना काळे फासण्याचे आंदोलन याचे पडसाद कोल्हापुरातही उमटले. कर्नाटक बसवर केलेली दगडफेक, शिवसैनिकांनी कर्नाटकच्या वाहनांना केलेली मनाई यामुळे सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. परिणामी यामध्ये सर्वसामान्य नागरिक वेठीस धरले जाऊ लागले आहेत. यात त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.         

गेल्या दोन दिवसापासून पुन्हा एकदा सीमावाद धुमसू लागला असून दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. याचा सर्वाधिक त्रास गडहिंग्लज, चंदगड, आजरा व सीमा भागात राहणाऱ्या नागरिकांना होत आहे. गडहिंग्लज आगारातून सुटणाऱ्या कोल्हापूर बसेस सध्या सेनापती कापशी मार्गे धावत आहेत. या बसचा तिकीट दर ११५ इतका आहे. याचा आर्थिक फटका तसेच वेळेचा अपव्यय व मानसिक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच संकेश्वर बस राज्य हद्द हिटनी पर्यंतच धावत आहे. तर निपाणी बस पूर्णपणे बंद आहेत. सीमा प्रश्न असा वारंवार उफाळून येत आहे. याचा सर्वाधिक त्रास विद्यार्थी, नोकरदार वर्ग, प्रवाशी यांना होत आहे. यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढून  सीमावाद संपवण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.