कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापुरामुळे आलेल्या संकटाने शहराचा पाणीपुरवठाआठवडाभर बंद राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर शहरासाठी पाणी उपसा करणारी पंचगंगा व भोगावती नदीपात्रातील केंद्रे महापुराच्या विळख्यात सापडली आहेत. पाणी पुरवठ्याची सर्व यंत्रणा पाण्यात बुडाली असल्याने महापालिकेने उपसा बंद केला आहे.परिणामी, कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा शुक्रवारपासून बंद आहे.

प्रशासनाने  टँकरने पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगितले आहे. पण यावेळी २०१९ सारखा स्थानिक नगरसेवकांचा आधार नसणार आहे हे ही लक्षात घेण आवश्यक आहे.  त्यामुळे या कालावधीत शहरवासीयांचे पाण्याशिवाय प्रचंड हाल होणार आहेत. २०१९ मधील महापुराच्या काळात शहरात तब्बल २२ दिवस पाणीपुरवठा झाला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर महापुराच्या पाण्यातून उपसा केंद्रे रिकामी झाल्यानंतर त्यांची देखभाल-दुरुस्ती करूनच ती सुरू केली जाणार आहेत. परिणामी, आठवडाभरापेक्षा जास्त कालावधीसाठी शहराचा पाणीपुरवठा खंडित राहण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.

सुमारे सहा लाख लोकसंख्येच्या शहराला पंचगंगा व भोगावती नदीतून पाणी उपसा करून पुरवठा केला जातो. पंचगंगा नदीतील पाणी शिंगणापूर उपसा केंद्रात तर बालिंगा व नागदेववाडी केंद्रासाठी भोगावतीतून पाणी उपसा केले जाते. शुक्रवारी पहाटे नद्यांना महापूर आला. परिणामी, नदी काठावर असलेली उपसा केंद्रे पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे आठ टँकर आहेत. खासगी २५ टँकर घेण्यात येणार आहेत. सांगली, सातारा, मिरजहून टँकरची मागणी करण्यात आली आहे. आणखी टँकरची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आले आहे. कोल्हापूर शहरातील सर्व खासगी टँकरही ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्याद्वारे शहरवासीयांना येत्या काही दिवसांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.