मुख्यमत्र्यांचा ‘ हा ‘ प्रस्ताव छ. संभाजीराजे मान्य करणार का ?

0
462

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. काल सायंकाळी छत्रपती संभाजीराजे यांनी वर्षा या निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत सध्याच्या राजकीय समीकरणावर चर्चा झाल्याचे समजते, या भेटी दरम्यान  शिवसेनेनं संभाजीराजेंसमोर काही अटी ठेवल्या आहे. तर संभाजीराजेंनी ही आपली भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्याच्या राज्यसभेच्या जागेबाबत आग्रही असल्याचे कळते, सहावी जागा शिवसेनेकडे असावी यासाठी ते मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत, या घडामोडीवर यांनी राज्यातील अपक्ष आमदारांची वर्षा निवास्थानी बैठक बोलवली होती. गेल्या काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी आपण ही जागा अपक्ष म्हणून लढवणार आहोत असे जाहीर केले होते त्यानुसार या बैठकीसाठी छत्रपती संभाजीराजे वर्षा बंगल्यावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये 35 मिनिटं चर्चा झाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरावा असे सांगितले तर संभाजीराजेंनी माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावी अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवली. या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर विचारविनिमय करून आमची भूमिका आपणास कळवतो असे सांगितले.

या सर्व घडामोडीतून नेमका काय मार्ग निघतो हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.