मुंबई (प्रतिनिधी) : चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण कोविडविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे, यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही. विशेषत: मुंबई आणि परिसरात निर्मात्यांनी चित्रीकरणाचे स्थळ व वेळ याबाबत पोलिसांशी समन्वय ठेवावा, आपल्या पथकातील कलाकार व इतरांची नियमित कोविड तपासणी करावी, लसीकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. चित्रपट निर्मात्यांच्या सर्वात मोठी संस्था असलेल्या प्रोड्युसर्स गिल्डच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज (शनिवार) दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

काही महिन्यांपासून हिंदी व मराठी चित्रपट आणि मालिकांचे निर्माते कोरोना काळात नियमांचे पालन करून चित्रीकरण करीत आहेत, परंतु चित्रीकरणाच्या वेळेत वाढ करणे गरजेचे आहे. सायंकाळी ४ नंतर देखील चित्रीकरण करण्यास परवानगी मिळाल्यास सर्वतोपरी काळजी घेऊन व नियमांचे पालन करून चित्रीकरण करता येणे शक्य आहे, यावेळी या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या कोविडविषयक निर्देशांचे पुरेपूर पालन करून चित्रीकरण पार पडले जाईल अशी ग्वाही ‘प्रॉंड्यूसर गिल्ड’च्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

निर्बंध टाकून तुम्हाला अडविणे आम्हालाही आवडत नाही, पण महाराष्ट्र आणि केरळसह देशातील इतर काही राज्यांमधून कोरोनाचा संसर्ग अजूनही आहे. चित्रपट निर्मात्यांनी कोविड संदर्भात आपल्या कलाकार व कर्मचाऱ्यांची विशिष्ट दिवसानंतर कोरोना चाचणी करीत राहणे आणि सर्वांचे लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे. मुंबई पोलिसांनी देखील प्रत्येक निर्मात्यांचे चित्रीकरणाचे वेळापत्रक, ठिकाण व वेळा याबाबतची माहिती निर्मात्यांकडून मागवून घ्यावी आणि एखाद्या अधिकाऱ्यावर समन्वयाची जबाबदारी द्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे प्रोड्युसर गिल्डचे रितेश सिधवानी, स्तुती रामचंद्र, मधु भोजवानी, राकेश मेहरा, नितीन आहुजा, दिग्दर्शक सुबोध भावे, नागराज मंजुळे, रवी जाधव सहभागी, शिवसेना नेते आदेश बांदेकर सहभागी झाले होते.