नूल (प्रतिनिधी) : पावसाचा हंगाम लांबल्यामुळे गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील हिरण्यकेशी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. थोडेफार शिल्लक असलेले पाणी शेतीसाठी उचलले जात आहे. पाऊस आणखी लांबला तर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. चित्री प्रकल्पातील पाणी नदी पात्रात सोडले असून, दोन-तीन दिवसाने हे पाणी नांगनूर पर्यंत पोहोचेल, असे पाटबंधारे खात्यामार्फत सांगण्यात आले.

जून महिना संपत आला तरी पावसाने हुलकावणी दिली आहे. पाऊस पडेल या आशेने शेताची मशागत करून शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला आहे. हिरण्यकेशीचे पात्र जरळीपासून पुढे कोरडे पडले आहे. त्यामुळे पूर्वभाग तहानलेला आहे. पात्रात ठिकठीकाणी शिल्लक असलेले पाणी शेतीसाठी उचलले जात आहे. आणखी काही दिवस पाऊस पडला नाहीतर पूर्व भागाला शेती व पिण्याच्या पाणी टंचाईस तोंड द्यावे लागणार आहे. सध्या चित्री प्रकल्पात ६५१ दलघफू (३४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. पाचव्या आवर्तनाने पाणी हिरण्यकेशीत सोडण्यात आले आहे. सध्या हे पाणी गिजवणेपर्यंत पोहोचले आहे, असे पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आले. नांगनूर येथे राज्याच्या सीमेपर्यंत पाणी पोहोचण्यास आणखी चार दिवसांचा अवधी लागेल.