टोप (प्रतिनिधी) :  हातकणंगले तालुक्यातील पाडळी येथे ग्रामसेवकाच्या बदलीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. सरपंच आणि सदस्यांनी ग्रामसेवक बदलीसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. तर विरोधकांनी ग्रामसेवकांची बदली करू नये. अन्यथा उपोषण करणार असल्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच हातकणंगले गटविकास अधिकारी शबाना मोकाशी या ग्रामसेवक बदलीबबत टाळाटाळ करत असल्याची तक्रार पाडळीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह वरिष्ठ कार्यालयाला दिली आहे.

सरपंच विभा पाटील आणि उपसरपंच रवींद्र मेथे-पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी ग्रामसेवक ए. डी. भारमल मनमानी कारभार करतात, तसेच  सदस्यांशी त्यांची वर्तणूक चांगली नाही. विकास कामात अडथळा आणत असल्याचा आरोप करत त्यांची बदली करण्यासाठी हातकणंगले गटविकास अधिकारी यांच्याकडे अनेकदा मागणी केली होती. सदस्य श्रीधर पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. तसेच ग्रामपंचायतीला टाळे देखील ठोकले होते.

तर गावातील विरोधक राहुल पाटील, शहाजी पाटील यांनी ग्रामसेवक व्यवस्थित कामकाज करतात. त्यांची बदली झाल्यास उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाला दिला आहे.