मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना आमदारांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासोबत सेनेचे जवळपास २५ आमदार गुजरातच्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये थांबले आहेत. या घटनाक्रमामुळे शिवसेनेला जबर हादरा बसला असला तरी आता सत्ताधाऱ्यांकडूनही भाजपचे आमदार फोडले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे भाजपपुढे आपले आमदार एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

भाजप महाराष्ट्रातील आपल्या सर्वच १०५ आमदारांना अहमदाबाद लगतच्या एका क्लबमध्ये हलविण्यात येणार आहे. त्यांच्या मुक्कामाची जबाबदारी गुजरात भाजपच्या काही बड्या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे महाराष्ट्रातील मविआ सरकार संकटात सापडले आहे. हे सरकार अल्पमतात आले, तर भाजपला सरकार स्थापन करण्याची सुवर्णसंधी आहे. यासाठी प्रथम त्यांना आपले १०५ आमदार एकजूट ठेवावे लागणार आहे.