कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिमेत रस्ते, चौक, उद्याने स्वच्छ करण्यासह सीबीएसी परिसराची स्वच्छता करण्यात आली. महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्वत: हातात झाडू घेऊन सीबीएस परिसरात स्वच्छता केली.

स्वच्छता मोहिमेतून सीबीएस परिसरासह शहरातील प्रमुख चौक, रस्ते, गटारी, नाले, फुटपाथ, घाट तसेच उद्यानामधील कचरा, प्लास्टिक, झाडांच्या फांदया कट करणे, वृक्ष लागवड, वॉल पेटींग तसेच स्वच्छता झाल्यानंतर त्या ठिकाणी औषध फवारणी करुन परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यात आला. शहरात स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत दुर्मिळ तसेच औषधी वृक्ष लागवड करुन वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देऊन नागरिकांना वृक्षारोपणाचे महत्व सांगण्यात आले.

टाकाळा चौक ते उड्डाण पुल, तलवार चौक ते सानेगुरुजी वसाहत बसस्टॉप पर्यंत, आयसोलेशन हॉस्पिटल मेनरोड, हॉकी स्टेडीयम ते गोखले कॉलेज, पंचगंगा नदी घाट परिसर, तसेच जयंती नदी मैला-सांडपाणी पंपिंग स्टेशन, रेणुका मंदिर ते हॉकी स्टेडियम चौक रोडवरील कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्याबरोबरच खुरटी झाडे, झुडपे आणि कचरा काढण्यात आली.

महानगरपालिका, स्वरा फाऊंडेशन आणि केआयटी कॉलेजतर्फे सीबीएस परिसरातील दाभोळकर कॉर्नर परिसरात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत हवा प्रदुषण रोखण्यासाठी विषारी वायू शोषुण घेणारी झाडेही लावण्यात आली. वाहन चालविणाऱ्या नागरिकांना गुलाब फूल देऊन हवा प्रदुषण रोखण्यासाठीच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.