इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीतील तारदाळ हद्दीलगत असलेल्या प्राईड इंडिया पार्कच्या सांगले मळ्यातील पानंद रस्त्यावर युवकाचा निर्घुण खून झाला आहे. संदीप घट्टे (वय ४०, रा. कोरोची, ता. हातकणंगले) असे या मृत युवकाचे नाव आहे.

इचलकरंजी लगत असलेल्या तारदाळ प्राईड इंडिया पार्क नावाची औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीमध्ये अनेक उद्योग आहेत. या वसाहती लगत सांगले मळा पानंद रस्ता परिसरात आज (रविवार) पहाटे कामगार कामावर जात असताना एका युवक रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. संबंधित युवकाच्या तोंडावर प्रचंड वार केले आहेत त्यामुळे चेहरा विद्रूप झाल्याने हा युवक नेमका कोण याची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी तातडीने याबाबत तपास सुरू केला. त्यानंतर हा युवक कोरोची येथील पानपट्टीचालक असल्याचे पुढे आले. व्यावसायिक स्पर्धेतून हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला आहे.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली. दरम्यान, गेल्या आठवड्यात जवाहरनगर सारख्या इचलकरंजी शहरातील एका महत्त्वाच्या भागात युवकाचा खून झाला होता. त्यानंतर लगेचच आज दुसरा खून झाल्याने नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.