इंगळी येथील लाच घेणाऱ्या तलाठ्याला पाठलाग करून पकडले

0
973

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वीट भट्टीसाठी माती उत्खनन करण्याकरीता रॉयल्टी भरून परवानगी देण्यासाठी ३० हजार लाचेची मागणी करून २५ हजाराची लाच स्वीकारताना इंगळी (ता. हातकणंगले) येथील तलाठी याला पाठलाग करून रंगेहाथ अटक केली. ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (मंगळवार) इचलकरंजी येथे केली. संतोष सुभाष उपाध्ये ( रा. केडीसीसी बँकेसमोर, कुरूंदवाड) असे अटक केलेल्या तलाठ्याचे नांव आहे.

वीटभट्टीसाठी माती उत्खनन करणेकरिता रॉयल्टी भरून परवानगी देण्यासाठी  तलाठी संतोष उपाध्ये यांनी तक्रारदारांकडे ३० हजारांची मागणी केली. परंतु तडजोडीअंती ही रक्कम २५ हजार ठरवण्यात आली. याबाबतची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार सापळा लावण्यात आला. ही रक्कम तक्रारदारांकडून स्वीकारताना उपाध्ये याला पोलिसांची चाहूल लागताच तो पळू लागला. अखेर त्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. 

या कारवाईत पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सहायक फौजदार बबंरगेकर, पोलीस नाईक सुनिल घोसाळकर, कृष्णात पाटील, कॉन्स्टेबल रूपेश माने यांनी सहभाग घेतला.