म्हसवे येथे पुस्तके भेट देऊन मुलाच्या स्मृती जागवल्या

0
60

गारगोटी (प्रतिनिधी) : घरात अठरा विश्व दारिद्र्य.. रात्रंदिवस अभ्यास करून एमपीएससी पास व्हायचे आणि मोठा अधिकारी बनायचे, हेच त्याचे ध्येय. त्या दिशेने तो राबला. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. त्याचे अधिकारी होण्याचे स्वप्न त्याच्या अकाली निधनाने अधुरेच राहिले. मात्र, मुलाचे अधुरे राहिलेले स्वप्न गावातील मुलांनी अधिकारी बनून साकारावे, यासाठी वडिलांनी गावातील अभ्यास केंद्राला पुस्तके भेट देऊन आपल्या मुलाच्या स्मृती जिवंत ठेवल्या. 

म्हसवे (ता.भुदरगड) येथील बाजीराव मारुती कांबळे यांना दोन मुले. दहावीत मुलगी गुणवत्ता यादीत आली. मात्र, दहावीनंतर मुलगीचा अचानक मृत्यू झाला. हा आघात ताजा असताना आता बी.कॉम झालेल्या मुलाचाही कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे बाजीराव कांबळे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

घरात अठरा विश्व दारिद्र्य त्यामुळे बाजीराव कांबळे चरितार्थ चालविण्यासाठी  गवंड्याच्या हाताखाली मजुरीवर जाणे,  उन्हाळ्यात गारेगार विकणे हे काम करत होते. त्यांच्या जोडीला पत्नीची साथ नेहमी असायची. पण मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना अधिकारी बनविण्याचे त्यांचे स्वप्न नियतीला मान्य नव्हते.

मुलगीचा अकाली मृत्यू, आता मुलाला शिकवायचे एवढेच त्यांच्यासमोर ध्येय होते. मुलगा शहाजी ऊर्फ सुनीलला बीकॉम पर्यंत शिक्षण दिले. वडिलांचे कष्ट त्याच्या डोळ्यासमोर दिसत होते. वडिलांच्या गरिबीचे पांग फेडायचे या जिद्दीने नरके फाउंडेशनमध्ये दाखल होऊन तो जिद्दीने अभ्यासाला लागला. एमपीएससी परीक्षा काही गुणांनी हुकली. मात्र, त्यांने जिद्द सोडली नाही तो गावातील अभ्यास केंद्रात रमला. मुलांनाही तो मार्गदर्शन करत राहिला. मात्र, अचानक त्याला दुर्धर आजाराची काही लक्षणे दिसू लागली. कोल्हापूर येथील दवाखान्यात त्याला दाखल केले. यावेळी त्याचे कॅन्सरचे निदान झाल्याने वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली.  आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून त्याच्यावर मुंबईतील टाटा हॉस्पिटल येथे उपचार घेतले. त्याची तब्येत हळूहळू सुधारू लागली कुटुंबालाही आनंदाचा पारावार राहिला नाही. मात्र, शेवटच्या टप्प्यात कोरोनाची महामारी सुरु झाल्याने मुंबई येथे उपचार घेणे थांबले. आणि सुनीलची तब्येत ढासळत गेली. आणि एक दिवस सुनीलची जगण्याची लढाई थांबली. मुलीच्या निधनापाठोपाठ मुलाच्या मृत्यूमुळे बाजीराव यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळले. मात्र, माझा मुलगा भले अधिकारी नाही झाला गावातील मुले अधिकारी बनतील, या उद्देशाने त्यांनी व त्यांच्या समाजाने हजारो रुपयांची पुस्तके अभ्यास केंद्राला भेट देऊन एक वेगळी श्रद्धांजली अर्पण केली.