होलोंडी येथे एका युवकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत विहिरीत आढळला…

0
585

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील नागांव येथील समतानगर परिसरात राहणाऱ्या नितीन दत्तात्रय कांबळे (वय ३८) याचा हालोंडी गावच्या हद्दीतील आरजे मळा येथील विहीरीत मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना काल (गुरूवारी) सायंकाळी शेतावर कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनात आल्याने त्यांनी याची माहिती शिरोली पोलिसांना दिली. यावेळी पोलीसांनी मृतदेहाची ओळख पटवून घटनास्थळावरच पीएम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

नितीन कांबळे याची सासुरवाडी गांधीनगर असून तो तिकडे जाऊन भाजीपाला घेऊन येतो असे सांगून दि. २ मे रोजी पहाटेच्या सुमारास सायकल घेवून घरातून गेला होता. पण तो परत न आल्याने त्याच्या पत्नीने मोबाईलवर संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद लागला. माहेरी फोन करून विचारपूस केली असता नितीन हा आला नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर तो सापडल्याने त्याच्या पत्नीने २ मे रोजी शिरोली पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुरूवारी त्याचा मृतदेह हालोंडी हद्दीत विहीरीत सापडला.

मात्र, नितीनला पोहता येत होते. त्याची सायकल आणि इतर साहित्यही तिथे न मिळून आल्याने नितीनची आत्महत्या की घातपात याबाबत गावात उलटसुलट चर्चा सुरु आहेत.