पंचगंगा नदीत ढकललेल्या मुलीचा मृतदेह सापडला

0
81

इचलकरंजी (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील यळगुड येथून बेपत्ता असलेल्या ९ वर्षीय प्रणाली साळुंखे या मुलीला सावत्र बापानेच पंचगंगा नदीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला होता. त्या मुलीचा रात्री उशिरापर्यंत पंचगंगा नदीत शोध सुरू होता. अखेर त्या मुलीचा मृतदेह आज (मंगळवार) दुपारी सापडला.

इचलकरंजी नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख संजय कांबळे व सहकाऱ्यांनी यांत्रिक बोटीच्या साह्याने मुलीच्या मृतदेहाचा पंचगंगा नदीमध्ये शोध घेतला. यावेळी इचलकरंजी शिवाजीनगर व हुपरी पोलीस पोलीस यांनी शोधकामात सहकार्य  केले. दरम्यान, मुलीचे सदरचे पार्थिव कोणाकडे द्यायचे यावरून नातेवाईकांमध्ये वाद सुरू झाला आहे.

दरम्यान, याप्रकरणी वडील युवराज साळुंखे याला इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. युवराजला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं मुलीला इचलकरंजीतील पंचगंगा नदीत ढकलून दिल्याची कबुली दिली. या माहितीनुसार पोलिस पंचगंगा नदीत रात्री उशिरापर्यंत मुलीचा शोध घेत होते. या शोध मोहिमेवेळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह मिळून आल्यानं ती महिला कोण याचाही शोध पोलिस घेत आहेत.