कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राजाराम बंधारा येथून पंचगंगा नदीत एक शाळकरी मुलगा मंगळवारी (दि.२०)  बुडला होता. संस्कार राहुल कुरणे वय १२ (रा. पोवार कॉलनी, कदमवाडी) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे.  दरम्यान, आज (गुरूवार) त्याचा मृतदेह शिये पुलाजवळ आढळून आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला.

मंगळवारी सकाळच्या सुमारास संस्कार राहुल कुरणे आणि नजिब नियाज ट्रेनर हे दोघे मित्र खेळण्यासाठी जातो, असे घरी सांगून राजाराम बंधारा येथे  पंचगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने संस्कार वाहून गेला तर नजीब वाहून जाताना या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी त्याला वाचवले होते. तर संस्कार याला वाचवण्यासाठी राजाराम बंधारा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु संस्कारला वाचवण्यात त्यांना यश आले नाही. गेले दोन दिवस अग्निशमन दलाच्या वतीने संस्कारचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु होते. अखेर आज त्याचा मृतदेह शिये पुलानजीक आढळून आला.

अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी मनिष रनभिसे, सुनील वाईगडे,  मधुकर जाधव, सुनील यादव, प्रमोद मोरे व अभय कोळी यांनी अथक परिश्रमातून संस्कार कुरणे याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. याबाबतची माहिती शिरोली एमआयडीसी पोलिसांना कळवण्यात आली आहे.